Saturday, 2 March 2013

फिशिंग कशी केली जाते ?

फिशिंग कशी केली जाते ?
काही हॅकर्स आपल्याला एक घाबरवणारा किंवा भुलवणारा ई-मेल पाठवतात.
उदा. त्या ई-मेलमध्ये ‘तुमच्या फेसबुक खात्याचे पासवर्ड एका हॅकरनि मिळवला आहे ...त्यामुळे निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी लगेच तुमचा पासवर्ड बदला...’ असे लिहिलेले असते. त्यासाठी या ई-मेलमध्ये एक ‘लिंक’ दिलेली असते. त्या लिंकवर क्लिक केले की आपल्यासमोर फेसबुकची वेबसाइट उघडली जाते असे आपल्याला वाटते.
खरे म्हणजे ही फेसबुकची वेबसाइट नसतेच मुळी. ती तर त्या हॅकरनि तयार केलेली स्वत:ची वेबसाइट असते. पण ती हुबेहूब फेसबुकच्या वेबसाइटसारखी दिसत असते. तिथे ‘तुमचा पासवर्ड बदलण्यासाठी सध्याचा पासवर्ड भरा’ वगैरे गोष्टी लिहिलेल्या असतात. आपल्याला हॅकर्सचं हे काम माहीत नसल्यामुळे आपण गुपचूप ही माहिती भरतो आणि आपल्याला जो नवीन, बदललेला पासवर्ड हवा आहे तोही तिथे टाइप करतो. मग ‘पासवर्ड बदलल्यामुळे आता सगळे ठीकठाक आहे, धन्यवाद’ वगैरे गोष्टी आपल्याला आपल्या संगणकाच्या पडद्यावर दिसतात.
पण इथेच सगळा घोटाळा झालेला असतो. हॅकरने हा ई-मेल आपल्याला स्वत:च फेसबुकच्या नावाने पाठवलेला असतो. त्यातही त्याने माहिती अशा प्रकारे लिहिलेली असते की आपला त्यावर चटकन विश्वास बसावा. तसेच हा ई-मेल त्याने अगदी फेसबुकचा वाटेल अशा ई-मेल आयडीवरून पाठवलेला असतो. त्यामुळे तो खरेच फेसबुककडून आलेला आहे, असे आपल्याला वाटते. तसेच त्या ई-मेलमध्ये त्या हॅकरने दिलेली ‘लिंक’ आपल्याला फेसबुकच्या वेबसाइटवर घेऊन जाते असे आपल्याला वाटत असले तरीही ती प्रत्यक्षात मात्र आपल्याला त्या हॅकरच्या बोगस वेबसाइटकडे नेत असते. मग तिथे आपण फेसबुकचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाइप केला की तो त्या हॅकरच्या हाती लागतो! मग तो हॅकर ही माहिती वापरून स्वत: फेसबुकच्या खऱ्या वेबसाईटवर जातो आणि तिथे आपल्याकडून मिळवलेला आपला खरा ई-मेल आयडी आणि पासवर्ड वापरून आपल्या खात्यात प्रवेश करतो.

No comments:

Post a Comment